‘प्रशासकीय विषयांची उत्तम समज असलेला नेता’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने राज्यात तीव्र शोकभावना पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे येणारे विशेष विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक कोसळले. अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात आग लागली असून विमान पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती विविध स्तरांतून दिली जात असली, तरी याबाबत अधिकृत आणि सविस्तर निवेदनाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त केला आहे. अजित पवार हे लोकनेते होते. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता. ते मेहनती असून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी सदैव पुढे असायचे. प्रशासकीय विषयांची त्यांना उत्तम समज होती आणि समाजातील गरीब व वंचित घटकांसाठी ते आत्मीयतेने काम करत, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. त्यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दु:खद असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पवार कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधानांनी दुसऱ्या संदेशात बारामती येथे झालेल्या विमान अपघाताबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपले स्वजन गमावले आहेत, त्या सर्वांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे नमूद केले आहे. या कठीण प्रसंगी संबंधित कुटुंबांना बळ आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली आहे.




