हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू , १७ जखमी
![A huge explosion outside Hafiz Saeed's house; Two killed, 17 injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/xhafiz-saeed-156223696.jpg)
लाहोर – 26/11 मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टर माईंड हाफिज सईदच्या पाकिस्तानमधील लाहोरच्या जोहर टाऊन येथील घराबाहेर भीषण स्फोट झाला आहे. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले असल्याचं वृत्त पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्फोट शहरातील एहसान मुमताज हॉस्पिटलच्या(Ahsan Mumtaz Hospital) ई ब्लॉकजवळ झाला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा स्फोट नक्की कशामुळे याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, गॅसपाईप लाईन फुटल्यानं किंवा सिलेंडर फुटल्यानं स्फोट झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात आतापर्यंत 12 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट कोणत्या कारणानं झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
लाहोरचे पोलीस उपायुक्त मुदस्सिर रियाज मलिक हे स्थानिक समा टीव्हीशी म्हणाले की, या स्फोटात महिला आणि लहान मुलांसह 12 लोक जखमी झाले. स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही, परंतु त्यामुळे घटनास्थळी प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. मलिक म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल तेव्हाच स्फोटाची कारणे समजतील. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.