कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नियमात बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-25.png)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनासंदर्भात नवे प्रोटोकॉल शनिवारी सकाळी जाहीर केले आहेत. यानुसार, कोरोना विषाणू संक्रमणाचे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलांनुसार, सौम्य कोरोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी टेस्टिंगची गरज नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत आणि परिस्थिती सामान्य असेल तर त्याला १० दिवसांत रुग्णालयातू डिस्चार्ज दिला जाणार आहे…रुग्णालयातून परतल्यानंतर या रुग्णांना १४ दिवसांऐवजी ७ दिवसांपर्यंत होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. १४ व्या दिवशी टेली कॉन्फरन्सद्वारे या रुग्णांचा फेरआढावा घेतला जाईल.
कोरोनाची सौम्य लक्षणं आढळल्यास…
ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नसतील किंवा अतिशय सौम्य असतील त्यांना कोविड केअर फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात येईल. इथं त्यांची पल्स ऑक्सिमेट्री मॉनिटरिंगसहीत नियमित तपासणी केली जाईल. या रुग्णांना तीन दिवसांत ताप आला नसेल तर १० दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. त्यापूर्वी टेस्टिंगची आवश्यकता नसेल. यांनाही होम आयसोलेशनचा ७ दिवसांचा कालावधी पूर्ण करावा लागेल. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्क्यांपर्यंत खाली गेलं तर रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (CDC) हलवण्यात येईल.
थोडे गंभीर लक्षणं आढळल्यास…
मध्यम गटात मोडणाऱ्या किंवा थोडे गंभीर लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसवर ठेवण्यात येईल. त्यांची बॉडी टेम्परेचर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन चाचणी केली जाईल. ताप तीन दिवसांत उतरला आणि रुग्णाचा पुढच्या ४ दिवसांपर्यंत सॅच्युरेशन लेव्हल ९५ टक्क्यांहून अधिक राहिला तर रुग्णांना १० दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाईल. परंतु, रुग्णाला श्वसनास त्रास आणि ऑक्सिजनची गरज नाही याची खातरजमा करावी लागेल. अशा वेळी रुग्णांना डिस्चार्जपूर्वी टेस्टिंगची गरज नसेल.
गंभीर रुग्णांसाठी…
रुग्णांची स्थिती गंभीर असल्यास अर्थात ते ऑक्सिजन सपोर्टवर असतील तर त्यांना क्लिनिकल लक्षणं दूर झाल्यानंतरच डिस्चार्ज मिळू शकेल. सलग तीन दिवसांपर्यत ऑक्सिजन सॅच्युरेशन मेन्टेन असणाऱ्या रुग्णांनाच डिस्चार्ज मिळणार आहे. याशिवाय एचआयव्ही रुग्णांना आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना क्लिनिकल रिकव्हरी आणि RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जाईल.
या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. पुन्हा ताप, कफ किंवा श्वसनास त्रास जाणवल्यास त्यांनी तातडीनं कोविड केअर सेंटर किंवा स्टेट हेल्पलाईन किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय. १४ व्या दिवशी रुग्णांचा फॉलोअप टेलिकॉन्फरन्सद्वारे करण्यात येईल.