ताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरच्या ३ चकमकीत ४ अतिरेकी ठार, एकाला अटक
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ३ ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये ४ अतिरेकी ठार झाले आहेत. ते लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी आहेत. पुलवामा येथील चकमकीत २, हंदवाडात एक आणि गांदरबलमध्ये एक अतिरेकी ठार झाला आहे. एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले, अशी माहिती काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी दिली.
पुलवामात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. तेथे जैश-ए-मोहम्मदचे २ अतिरेकी ठार झाले. त्यांची ओळख पटलेली नाही. पुलवामाच्या चेवाकला परिसरात ही चकमक झाली. हंदवाडा येथील रजवाडा क्षेत्रात शनिवारी पहाटे चकमक झाली. त्यात एक अतिरेकी ठार झाला. गांदरबल येथील चकमकीत एका अतिरेक्याला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईत एका अतिरेक्याला जिवंत पकडले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.