गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडले; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा निर्णय
![3000 KG drugs found in Gujarat; Union Home Minister Amit Shah's big decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Amit-Shah-1.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
मागील तीन महिन्यापुर्वी अदानी ग्रुपकडून चालवण्यात येणाऱ्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटींच्या किंमतीचे 3 हजार किलो अफगाण हिरॉईन सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री तथा प्रथम सहकारमंत्री अमित शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शाह यांनी सर्व भारतीय बंदरांवरील कार्गो कंटेनरची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या कंटेरनमधून प्रतिबंधित मालाची वाहतूक होऊ नये यासाठी त्यांनी आदेश दिला. तसेच नार्को समनव्य केंद्राच्या बैठकीत त्यांनी याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत.
अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान, गृहसचिव अजय भल्ला, राज्याचे मुख्य सचिव, निमलष्करी दलांचे प्रमुक आणि इतर केंद्रीय यंत्रणा सहभागी होत्या. यावेळी शाह यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पोलीस, केंद्रीय शस्त्र पोलीस दल, सरकारी वकील आणि नागरी विभागातील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नार्कोटिक्स संबंधी प्रशिक्षण देण्यास यंत्रणांना सांगितलं आहे.
संबधित अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे आणण्यात आलेल्या ड्रग्जची माहिती मिळवण्यासाठी श्वान पथक तयार करण्यास शाह यांनी सांगितलं. तसेच केंद्रीय अमंली पदार्थ नियंत्रण विभाग राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाच्या समन्वयाने याबाबत एक धोरण तयार करणार आहे. जेणेकरुन सर्व राज्यांतील कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना बेकायदेशीर अंमली पदार्थांची माहिती मिळवणाऱ्या श्वान पथकांपर्यंत पोहोचता येणार आहे.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या बैठकीत अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राज्य पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नार्को समनव्य केंद्राच्या राज्य सचिवालय म्हणून ते काम करतील. अंमली पदार्थ तस्करीत डार्क नेटचा वाढता वापर आणि क्रिप्टोकरन्सीचा वाढता वापर रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्याचबरोबर देशभरात होणाऱ्या ड्रग्जच्या अवैध लागवडीवर नजर ठेवण्यासाठी सॅटेलाईट आणि इतर तंत्रज्ञानाचा वापरही ते करतील असं सांगण्यात आलं आहे.