हिंगणघाट जळीतकांड: “माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय.मला गोळी झाडून मारुन टाका,”- आरोपी विकेश नगराळे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-77.png)
एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या हिंगणघाट येथील तरुणीची मृत्युशी निकराची झुंज अपयशी ठरली. सोमवारी पहाटे तिचा मृत्यू झाला आणि वर्ध्यासह अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडितेला त्वरीत न्याय मिळावा आणि आरोपी विकेश नगराळे याला लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी या मुलीच्या मृत्यूनंतर होताना दिसत आहे. राज्य सरकारने देखील हा खटला जलद गतीने चालवण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये आता आरोपी विकेश नगराळेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे….
पीडितेचा मृत्यू झाल्याचे आरोपी विक्कीला ठाऊक नव्हते. मात्र यासंदर्भात त्याला माहिती देण्यात आल्यानंतर त्याने एक मागणी केली आहे. पीडितेचा मृत्यू झाल्याचे विक्की नगराळेला सांगण्यात आल्यानंतर त्याने “माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने मला गोळ्या झाडून मारुन टाका,” अशी मागणी केली आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यातील जनतेने व्यक्त केलेला संताप आणि लोकभावनेच्या दबावामधून आरोपीने अशी मागणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
सोमवारी पीडितेचा मृत्यू झाला त्या दिवशी याबद्दलची कोणतीच माहिती विक्कीला नव्हती. पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी आरोपीला देण्यात आली. त्यानंतर तो बराच काळ आरोपी काहीच न बोलता एकाच जागी उभा होता. नंतर तो आपल्या बॅरेकमध्ये पलंगावर बराच वेळ बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसून येत नव्हता. दैनंदिन झडतीदरम्यान आरोपीने “माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय तर मला गोळी झाडून मारुन टाका,” अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.