सौदी अरेबियाने २० देशांची हवाई वाहतूक केली स्थगित
![UAE lifts restrictions on Indian airlines](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Airlines-delayed.jpg)
रियाध – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदी अरेबियाने भारत-पाकिस्तानसह २० देशांतील हवाई वाहतूक स्थगित केली आहे. बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून हा आदेश लागू होणार असून यानुसार आता सौदी अरेबियाचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच सौदी अरेबियात प्रवेश करता येणार आहे.
सौदी अरेबियाने संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, इजिप्त, लेबनॉन आणि भारतासह २० देशांतील नागरिकांना आपल्या देशात बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे सौदी अरेबियात आतापर्यंत 3,68,639 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 6,379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3,60,110 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, 21 डिसेंबर 2020 रोजी सौदी अरेबियाने परदेशात जाणाऱ्या-येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर सौदीने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर 4 जानेवारी रोजी ही स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सौदी अरेबियाने 20 देशांतील हवाई वाहतूक स्थगित केली आहे.