विशाखापट्टनममध्ये विषारी वायूची गळती, आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/vizag-gas-.jpg)
नवी दिल्ली | आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये एका फार्मा कंपनीमध्ये गॅस लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. अजुनही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि नेव्हीने फॅक्ट्री जवळील गावे रिकामी केली आहेत. आरआर वेंकटापूरममध्ये असलेल्या विशाखा एलजी पॉलिमर कंपनीमधून या विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे कारखान्याच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग बाधित आहे. या क्षणी पाच गावे रिकामी करण्यात आली. शेकडो लोकांना डोकेदुखी, उलट्या आणि श्वास घेण्यास अडचण येत आहे. हे सर्व लोक रुग्णालयात पोहोचत आहेत.
तासाभर मेहनत घेतल्यानंतर वायू गळती बंद करण्यात आली आहे. यासह कारखान्याच्या आसपासच्या भागातून 3 हजार लोकांना वाचविण्यात आले आहे. सध्या 170 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे विशाखापट्टणमला रवाना झाले आहेत. शासकीय रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मुख्यतः वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 150-170 लोकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त बर्याच लोकांना गोपाळपुरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 1500-2000 बेडची व्यवस्था केली गेली आहे.