रेल्वे तिकीट आरक्षणाचा हा नियम आजपासून बदलणार
![Railways earned Rs 11,778 crore from freight in December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/train.jpg)
नवी दिल्ली – करोना काळात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे, जो आज म्हणजेच शनिवारपासून लागू होईल. नव्या नियमानुसार, आता ट्रेनमध्ये तिकीट आरक्षणाचा दुसरा तक्ता प्रस्थानापूर्वी अर्धा तास अगोदर जारी केला जाईल. गेल्या काही महिन्यात करोनाचं संकट लक्षात घेता रेल्वेने हा कालावधी दोन तास एवढा केला होता.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ‘करोना संकटाच्या अगोदर दिशानिर्देशांनुसार पहिला आरक्षण तक्ता ट्रेन निघण्याच्या निर्धारित वेळेच्या चार तास अगोदर तयार केला जायचा, जेणेकरुन उपलब्ध जागा दुसऱ्या तक्त्यात ‘प्रथम या-प्रथम मिळवा’ तत्वानुसार पीआरएस काऊंटर आणि इंटरनेट बुकिंगच्या माध्यमातून दिल्या जाऊ शकतील.’
रेल्वेच्या माहितीनुसार, दुसरा आरक्षण तक्ता ट्रेन निघण्याच्या ३० ते ५ मिनेट अगोदर तयार केली जात होता. अगोदरपासून बुक असलेल्या तिकिटांवरही नियमांनुसार रिफंड देण्याची तरतूद नियमात आहे. करोना संकटाच्या काळात अर्ध्या तासाचा नियम बदलून तो दोन तास एवढा करण्यात आला होता.
प्रवाशांच्या सोयीसाठी विभागीय रेल्वेच्या विनंतीनंतर दोन तासांचा नियम बदलून तो पुन्हा अर्धा तास करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नव्या नियमानुसार, ऑनलाइन आणि पीआरएस तिकीट काऊंटरवर तिकीट बुकिंग दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्याच्या अगोदर उपलब्ध होईल. यासाठी सीआरआयएस सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला आहे.
करोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २५ मार्चपासून सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, १ मेपासून आपल्या राज्यात परतण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली.