राहुल गांधी यांनी सुरक्षेबाबतचे नियम पाळले नाही- राजनाथ सिंह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/rajnath-rahul.jpg)
नवी दिल्ली : ‘गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला ते स्वत:च जबाबदार आहेत. त्यांनी सुरक्षेचे नियम पाळले नाहीत,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केला. त्याचबरोबर, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी संरक्षण नाकारून राहुल गांधी काय लपवू पाहत आहेत,’ असा सवालही त्यांनी केला. राजनाथ यांच्या या पवित्र्यामुळं राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरू पाहणाऱ्या काँग्रेस सदस्यांचीच गोची झाली.
मागील आठवड्यात गुजरात दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाली होती. काँग्रेस खासदारांनी आज लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस सदस्यांच्या या प्रश्नांना उत्तरं देताना राजनाथ यांनी राहुल यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ‘गुजरात दौऱ्यावर असताना राहुल यांनी स्थानिक पोलिसांच्या सूचनांकडं दुर्लक्ष केलं. ते फक्त स्वत:च्या सचिवाचं ऐकत होते. पोलिसांनी पुरवलेलं वाहन त्यांनी घेतलं नाही. बुलेटप्रूफ कारमध्ये बसण्यासही त्यांनी नकार दिला. इतकंच नव्हे, पोलिसांचं सुरक्षा कडंही त्यांनी अनेकवेळा तोडलं,’ असं राजनाथ म्हणाले.
‘सरकारी संरक्षण घ्यायला राहुल गांधी नेहमी टाळाटाळ करतात. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सहावेळा परदेश दौरा केला. ते तब्बल ७२ दिवस परदेशात होते. या काळात सरकारनं त्यांना देऊ केलेलं एसपीजी संरक्षण त्यांनी घेतलं नाही. ते संरक्षण का घेत नाहीत? संरक्षण न घेता परदेशात जाणारे राहुल गांधी नेमकं काय लपवू पाहत आहेत?,’ असा सवाल राजनाथ यांनी केला. ‘हे एसपीजी कायद्याचं उल्लंघन आहेच, शिवाय सुरक्षेविषयीची बेफिकीरी आहे,’ असं राजनाथ म्हणाले.