रघुराम राजन यांना पद्धतशीरपणे खोटे पाडले जाईल : शिवसेना
मुंबई | कोरोना व्हायरसने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे देशापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीचा धागा पकडून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.
‘ही शहाणे होण्याची वेळ आहे’ या शिर्षकाखाली सामनात आजचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती, या मुलाखतीतील मुद्द्यांना हात घालून मोदी सरकारला सल्लावजा टोला लगावण्यात आला आहे. ‘लॉकडाऊनमुळे महसुलात तूट वाढत जाईल आणि राज्य चालवणे कठीण होईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च, शेतकरी कर्जमाफी, अस्मानी-सुलतानी संकटाचा विचार केला तर योजना राबवायच्या कशा? केंद्राचेही तसेच होणार आहे. हिंदुस्थानात यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून कोरोनाच्या संकटानंतर देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा.
देश पाठीशी उभा राहील. राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे’, असं म्हणत सेनेनं भाजपला टोला लगावला आहे.