मार्चमध्ये पुन्हा बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक….सलग पाच दिवस बँका बंद…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-50.png)
दोन दिवसाच्या राष्ट्रीय संपानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ११ ते १३ मार्च असा तीन दिवस संप करण्याची घोषणा केली आहे. याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता असून ऐन होळीच्या सणासुदीत ग्राहकांना मनस्त:प सहन करावा लागणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Bank-Bandh-Govt-bank-employees-to-call-for-2-day-strike-from-Jan-31.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bank-strike-today-1580437964-1024x576.jpg)
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. ८ जानेवारीच्या भारत बंदमध्ये बँक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कमर्चाऱ्यांनी संप केला होता. मात्र त्याला केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा एकदा कर्मचारी संघटनांनी सलग तीन दिवस संप करण्याचा एल्गार केला आहे. ११ ते १३ मार्च असा तीन दिवस संप केला जाणार आहे. त्यावरही सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार केला नाही तर एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Banks_PTI_3x2_0-1024x853.jpg)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना देशभरात सार्वजनिक बँकांचे कर्मचारी सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा कायमस्वरूपी आठवडा असावा, असा आग्रह केला आहे. मात्र इंडियन बँक असोसिएशनने ही मागणी धुडकावून लावली आहे. देशात सार्वजनिक सुट्या खूप असल्याने पाच दिवसांचा आठवडा शक्य नाही, असे इंडियन बँक असोसिएशनने म्हटलं आहे.