महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि राज्यातील स्थितीबाबत माहिती देत चर्चा केली.
त्यानंतर एक सामायिक कार्यक्रम ठवून चर्चा पुढे चालू ठेवली. आता या चर्चेला मोठे यश आले आहे. दरम्यान, काँग्रेसने ही सत्ता स्थापन करण्याआधी एक अट घातली आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेला आपल्या मुद्याला मुरड घालावी लागणार आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीसोबत झालेल्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला अशी माहिती पुढे आली आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी शिसेनेसोबत जाण्यास संमती दिली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर आधी शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत.