ब्रिटनमध्ये ९० वर्षीय आजींना कोरोना लसीचा पहिला डोस
![The first dose of corona vaccine was given to a 90-year-old grandmother in Britain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/britan-90-years-gradma-corona-vaccine.jpg)
लंडन – कोट्यवधी लोक कोरोनाच्या संक्रमणात येत असताना सर्वसामान्य नागरिक कोरोनावर लस कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे जगभरातील अनेक देश कोरोनावरील लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. अशात ब्रिटनने आपल्या कोरोना लसीला मान्यता देऊन आजपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये आज एका ९० वर्षीय वृद्ध महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे. त्यामुळे ही जगातील कोरोना लस घेणारी पहिली महिला ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव मार्गारेट कीनन असे असून त्या उत्तर आयर्लंडच्या रहिवासी आहेत. मध्य ब्रिटनच्या कॉवेंट्रीमधील युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात त्यांना ही लस देण्यात आली. विशेष म्हणजे डोस देण्यात आलेल्या मार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात ९१ वर्षांच्या होणार आहेत आणि आपल्याला मिळालेली ही वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वाचा :-देशात 24 तासांत 32,981 नवे कोरोना रुग्ण
‘कोरोनावर मात देणाऱ्या लसीचा पहिला डोस मला देण्यात आला याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट आहे. या वर्षातला बहुतेक काळ एकटं घालवल्यानंतर आता या लसीमुळे नवीन वर्षात मी माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकेन. जर मी ९०व्या वर्षात ही लस घेऊ शकते. तर तुम्हीही घेऊ शकता’, असे म्हणत मार्गारेट यांनी इतरांनाही हुरूप देण्याचे काम केले आहे.
दरम्यान, आता येत्या काही आठवड्यांत युकेमध्ये फायझर-बायोएनटेकच्या पहिल्या टप्प्यातील ८ लाख डोस देण्यात येणार आहेत. तर या महिन्याच्या अखेरीस ४० लाख डोस उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. युकेमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.