ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी
![Ban on flights from Britain to India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ब्रिटन-viman.jpg)
लंडन – ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. युकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना कोरोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमानतळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.