‘बॅट वुमन’ चा मोठा इशारा, वुहान लॅबच्या उपसंचालिका म्हणाल्या- पुन्हा पसरू शकतो विषाणू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Woohan.jpg)
बीजिंग | चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. दरम्यान, चीनमध्ये वटवाघुळांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्टनुसार, कोरोना विषाणू तर समस्येचा केवळ एक भाग आहे, खरी समस्या तर खूप मोठी आहे. वटवाघुळांमध्ये कोरोनासारखे अनेक घातक विषाणू दडले असल्याचा इशारा त्यांनी दिला.
चीनमधील बॅट वुमन या नावाने प्रसिद्ध वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या उपसंचालिका शी झेंगली म्हणाल्या, वटवाघुळाप्रमाणे इतर जंगली प्राण्यांमध्ये कोरोनासारखे अनेक घातक विषाणू आहेत. वेळेवर याचा शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात जगाला याच प्रकाराच्या महामारीचा सामना करावा लागू शकतो. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेतूनच कोरोना पसरल्याची चर्चा होती. झेंगली म्हणाल्या, विषाणूबाबत होणाऱ्या संशोधनाविषयी सरकार आणि शास्त्रज्ञांनी पारदर्शकपणे काम करण्याची गरज आहे. विज्ञानाबाबतचे राजकारण दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी चीनची सरकारी वाहिनी सीसीटीएनवरून सांगितले, आपल्या पुढच्या महामारीपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर जंगली प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंवर संशोधन करुन त्याबाबत वेळीच जागृत केले पाहिजे.