‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Paulo-Travels.jpg)
पणजी | ‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून प्रवासी बस वाहतुकीचे देशभर जाळे विणणाऱ्या मारियो परेरा यांचे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान गोव्यात त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ‘पावलो कंपनी’च्या बसचालकांनी अनोख्या पद्धतीने मानवंदना देत आपल्या लाडक्या मालकाला अखेरचा निरोप दिला.
‘म्हापशाचे सुपुत्र’ अशी ओळख असलेल्या मारियो सुकूर परेरा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारही करण्यात येत होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परेरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मायरन असा परिवार आहे.
‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून मारियो परेरा यांनी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता. परेरा यांनी पावलो हॉलिडे मेकर्सच्या ब्रँड अंतर्गत पावलो ट्रॅव्हल्स ही प्रवासी वाहतूक कंपनी सुरु केली. जवळपास गेली वीस वर्षे ही कंपनी दक्षिण भारतासह महाराष्ट्र-गोव्याची ओळख झाली होती. मुंबई-गोवा प्रवास आणि ‘पावलो ट्रॅव्हल्स’ हे जणू समीकरणच झालं होतं.
मारियो परेरा यांचं पार्थिव शववाहिकेतून अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आलं. अंत्ययात्रेच्या वेळी ‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या सर्व लक्झरी बसेस एका रांगेत शववाहिकेच्या मागून सोडण्यात आल्या. बसचालकांनी सलग हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला विशेष मानवंदना दिली. परेरा यांच्या निधनाने गोव्याचा सुपुत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.