पंजाबमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट
इटलीहून परतलेल्या पंजाबमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट झाले. अमृतसरमधील गुरु नानक देव रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. या दोन्ही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचा प्राथमिक अहवाल आला आहे.
इटलीतून परतल्यानंतर विमानतळावर या दोघांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयातील विशेष वॉर्डात विलगीकरण पद्धतीने ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. प्रभदीप कौर यांनी सांगितले की या दोन्ही रुग्णांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे दोन्ही नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रुग्णालयाला मिळाला आहे.
या रुग्णाचे नमुने दुसऱ्यांदा एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच असल्याचे खातरजमा करण्यासाठी अशा पद्धतीने दोनदा नमुने पाठवण्यात येतात. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल येणार आहे. त्यानंतर याबाबत अजून स्पष्टता येईल, असे डॉ. कौर यांनी सांगितले.