न्यूझीलंड | लॉकडाऊनमध्ये सूट वाढणार, चर्चही उघडतील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/jacinda-ardern-gty-jt-200415_hpMain_16x9_992.jpg)
वेलिंग्टन | न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे केवळ २२ रुग्ण राहिले आहेत. यातील केवळ एकच रुग्णालयात आहे. बाकीचे जास्त गंभीर नाहीत. यामुळे त्यांच्यावर घरात देखरेख ठेवली जात आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्नने याला पुष्टी दिली. देशात आठवडाभरात नवीन रुग्ण आढळला नाही. मागील २० दिवसांत एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे सरकारने २९ मे पासून लॉकडाऊनमध्ये आणखी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. १०० जण एकत्र येऊ शकतील. आतापर्यंत १० जणांनाच याची परवानगी होती. चर्च, कॅफे, रेस्टॉरंट उघडतील. सामुदायिक खेळांना परवानगी असेल.
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांना सरकार आठवड्याला १७३६० रुपये देईल. न्यूझीलंडमध्ये २८ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. २८ रुग्ण झाल्यानंतर सरकारने येथे १९ मार्चला कडक लॉकडाऊन लागू केले. देशाच्या सीमा बंद केल्या. बेटावर देश असल्याने न्यूझीलंडसाठी सीमेवर नियंत्रण सोपे होते. येथे आतापर्यंत १५०४ रुग्ण आढळले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४६१ जण बरे झाले आहेत.
सिडनी | ऑस्ट्रेलियात ६८ दिवसांनी ५०० पेक्षा कमी म्हणजे ४७८ रुग्ण बाकी आहेत. सरकारने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये जास्त सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एका ठिकाणी ८० जण एकत्र येऊ शकतील. पब, रेस्टॉरंट, सलून, खेळाचे मैदान, स्केटिंग पार्क, आउटडोर जिम, संग्रहालय, थीम पार्क उघडतील. विद्यार्थी, कर्मचारी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करू शकतील. महामारीच्या आधी ९ लाख विद्यार्थी, १.१० लाख कर्मचारी त्याचा वापर करायचे. आतापर्यंत ७१३३ रुग्ण आढळले आहेत. १०२ मृत्यू झाले आहेत. १६ मे नंतर रोज १५ पेक्षा जास्त रुग्ण आले नाही. पहिला रुग्ण २५ जानेवारीला आला होता. डब्ल्यूएचओच्या मनाई नंतरही सरकारने वेळीच सीमा बंद केल्या. सखोल तपासणी, स्वविलगीकरण, फिजिकल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाचा प्रसार थांबल्याचे तज्ञांचे म्हणने आहे.