नाशिकमध्ये अनेक भाग मुसळधार पावसाने पाण्याखाली…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/nsk01-7.jpg)
नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं होत… शहरातील अनेक भाग, रस्ते पाण्याखाली गेले. सराफ बाजार आणि लगतच्या परिसरात पाण्याचे लोंढे शिरून सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झालंय… तळातील वाहने पाण्याखाली गेली. नाले सफाईची कामे योग्य प्रकारे न झाल्याचा फटका पुन्हा बसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी गटारी तुडूंब भरल्याने पाणी बाहेर उफाळलं गेलं. पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील इमारतीच्या तळ मजल्यातही पाणी शिरलं…
मान्सूनचे आगमन झाल्यापासून अधुनमधून संततधारेची अनुभूती घेणाऱ्या नाशिक शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सलग तीन ते चार तास मुसळधार पाऊस झाला. कमी वेळात इतका पाऊस होण्याची ही हंगामातील पहिलीच वेळ आहे..त्यामुळए शहरातील बरेच परिसर हे पाण्याखाली गेले आहेत…
पावसाने मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वरील भागातून सराफ बाजारासह दहिपूल, हुंडीवाला लेन, शुक्ल गल्ली आणि फूल बाजार परिसरात वेगाने पाणी येत होते. तीन ते साडेतीन फूट अर्थात गुडघाभर पाण्यात हा परिसर बुडाला. या परिसरात सरस्वती नाला आहे. कचरा अडकल्याने तो तुंबतो. पावसाळ्याआधी त्याची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, ही स्वच्छता न झाल्याचा फटका पुन्हा दुकानदारांना बसला.फुलबाजारालगत वाहनतळ आहे. तेथील वाहने पाण्यात गेली. यालगतच्या प्रसाधनगृहाची वाहिनी तुंबल्याने पावसाच्या पाण्याबरोबर दुर्गंधीयुक्त घाण पाणी सर्वत्र पसरले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/freepressjournal_2019-06_93c4ef13-5434-449e-980e-343fece6cf1e_Mumbai_Rain-1024x768.jpg)
टाळेबंदीत सम-विषय तारखांनुसार दुकाने उघडली जातात. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याची अनेक व्यावसायिकांना कल्पना नव्हती. संघटनेमार्फत दुकानदारांना माहिती देण्यात आल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले. नंतर संबंधितांनी बाजारपेठेत धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत दुकानदार, लहान-मोठे व्यावसायिक आपले किती नुकसान झाले याचे मोजमाप काढत होते…
शहरातील अनेक रस्ते, सखल भागात पाणी साचले. मुंबई नाका लगतच्या रस्त्यावर झाड कोसळले. गडकरी चौकातून शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिका आयुक्त वास्तव्यास आहेत. त्यांच्या बंगल्यासमोरील इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचले होते. अग्निशमन दलाने धाव घेऊन पाण्याचा निचरा होईल यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वरमध्ये रिपरिप सुरू होती. निफाड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
फुल बाजारातील तळात उभी असणारी वाहने पाण्याखाली गेली. परिसरातील मुतारी तुंबली. परिणामी घाण पाणी सर्वत्र पसरले. बेकरी, सराफ, कपडय़ांच्या दुकानांमध्ये पाणी गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे जैन बेकरीचे संचालक पवन पोहरा यांनी सांगितले. दुकानातील सर्व माल खराब झाला. यंत्रसामग्री पाण्याखाली गेली. तिच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल. यामुळे दुकान बंद ठेवावे लागणार असल्याचे ते म्हणाले. अशी आपत्ती परिसरातील अनेकांवर ओढावली. दुकानात शिरलेले पाणी आणि गाळ बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे. सरस्वती नाल्याची सफाई झाल्याचा दावा केला जातो. परंतु, त्यात तथ्य नसल्याचे अनेक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरवर्षी या संकटाला तोंड द्यावे लागते. अतोनात नुकसान होत आलं आहे..आणि यंदाही हीच सपरिस्थिती पहायला मिळतेय…त्यामुळे यावर कायमचा तोडग काढण फार महत्तवाचं आहे…