नागपुरात दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/0Pune_PMPML_Tukaram_Mundhe_t.jpg)
नागपूर | नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. 18 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचा आकडा 11 हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर कोरोना बळींची संख्या 400 पार गेल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी शहरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. येत्या 18 ऑगस्टपर्यंत दुकानदारांनी आपली कोरोना चाचणी करुन चाचणीचं प्रमाणपत्र दुकानात ठेवायचं आहे. ज्या दुकानादराकडे कोरोना चाचणीचं प्रमाणपत्र दिसलं नाही, त्यांच्यावर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार आहे.
नागपूर शहरात साधारण 30 हजार दुकानं आहेत. 70 ते 80 हजार दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. या सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सनेही दुकानदारांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.