नव्या वर्षांत घरगुती गॅस सिलिंडर महागणार
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र, येत्या नव्या वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नव्या वर्षापासून सरकारी तेल कंपन्या (दर आठवड्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेण्याची योजना आखत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या या योजनेसाठी तयारी करत आहेत. सध्या दर महिन्याला गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो, ज्यानंतर किंमती कमी होतात किंवा वाढतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले जातात.
वाचा :-कृषी कायद्यावर राहुल गांधींनी चर्चेसाठी यावे; जावडेकरांचे खुले आव्हान
डिसेंबर महिन्यात दोन वेळा एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. आधी 1 तारखेला आणि त्यानंतर 15 तारखेला ही दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ पाहता एलपीजी वितरकांचं असं म्हणणं आहेकी आता दर आठवड्याला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ होईल. यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल.
सध्या दिल्लीमध्ये विना सबसिडीच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे मुल्य 694 रुपये प्रति सिलेंडर आहे, मुंबईमध्ये देखील हाच भाव आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरचा दर 720.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 710 रुपये प्रति सिलेंडर आहे. 15 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू झाली आहे. 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरमध्ये देखील 18 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 36.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून 12 गॅस सिलेंडरसाठी सबसिडी मिळते.