धक्कादायक! १ लाख ७५ हजार रूपयांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले
![Four people have been arrested on charges of gang-raping a woman at Sidhi in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/arrest-1-1.jpg)
गडचिरोलीत वडसा वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार (४८) व बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा पूनमसिंग उईके या दोघांना १ लाख ७५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.
कोरची येथील तक्रारदार ५५ वर्षीय पुरूष यांना सर्व्हे. क्रमांक १ ते ११ मधील मालाच्या चौकशीत शिथीलता देण्यासाठी वडसा वन विभागातील फिरते पथकातील (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार व कोरची तालुक्यातील बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा उईके यांनी २ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रूपये अशी लाचेची रक्कम वन परिक्षेत्र अधिकारी प्रेरणा पुनमसिंह उईके यांचे मार्फत स्विकारण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरूध्द लाच घेतल्या प्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात येवून, त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वार लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलीस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर, घनश्याम वडेट्टीवार यांनी यशस्वीपणे पार पाडली.