धक्कादायक! बंगळुरूत एकाच इमारतीतील १०३ जणांना कोरोनाची लागण
![The number of corona victims in the state is at 32,29,547](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/1800x1200_coronavirus_1.jpg)
बंगळुरू – बंगळुरूतील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील तब्बल १०३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिथे झालेल्या पार्टीनंतर हा प्रकार समोर आला असून बंगळुरू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या १०३ रुग्णांपैकी ९६ जणांचे वय ६० पेक्षा अधिक आहे.
बोम्मनहळ्ळी भागातील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील तब्बल १०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीतील एका व्यक्तीला सर्दी, ताप आदी त्रास सुरू झाला. तपासणीतून तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या चौकशीनंतर इमारतीत राहणाऱ्या सर्व १०५२ जणांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यावेळी तब्बल १०३ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. या प्रकारानंतर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी बंगळुरूतील मंजुश्री कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या ४० विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या संस्थेत शिकणाऱ्या २१० विद्यार्थिनींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.