देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/agrawal.jpg)
नवी दिल्ली | एकीकडे दिवसागणिक देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशातील २३ राज्यांतील ५४ जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा एकूण वेग पाहता ही बाब भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १५७१२ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १३३४ नवे रुग्ण आढळून आले. तर २७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाचे २२३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
अशातच आता देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अशा जिल्ह्यांची संख्या ४७ इतकी होती. मात्र, लॉकडाऊन आणि इतर सरकारी उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज मध्यरात्रीपासून कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम असतील. येत्या ३ मेपर्यंत धार्मिक स्थळ आणि अन्य कार्यक्रमांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, हे करताना कोणतीही चूक घडता कामा नये, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.