दुःखद! प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोना बाधित मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित
![# Covid-19: Delivery of 20 Corona Infected Mothers; Demand for a dedicated maternity hospital in Dahanu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/dt_200625_pregnant_coronavirus_covid-19_800x450.jpg)
नागपूर: प्रसुतीनंतर कोरोनाग्रस्त मातेने अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात समोर आलेली आहे. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र प्रसुतीनंतर काही क्षणातच कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलेले आहे. बाळंतीणीचा मृत्यू झालेला असला, तरी सुदैवाने नवजात बाळ सुरक्षित आहे. संबंधित 20 वर्षीय गर्भवतीला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी ‘मेयो’त उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. प्रसववेदना होत असल्याने तिला मेयोतील कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
गरोदरपणातील व्याधी (प्रेग्नंसी हायपरटेन्शन) असलेल्या गर्भवतीला अतिदक्षता विभागात दाखल करुन कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर उपचार सुरु केलेले होते. त्यानंतर असह्य प्रसुतीवेदना येत असल्याने तिला तातडीने लेबर रुममध्ये शिफ्ट करण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर ठेवून मेयोतील डॉक्टरांनी तिची डिलीव्हरी केली आहे. प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित आहे, मात्र दुर्दैवाने 20 वर्षीय आईने प्राण सोडले. या घटनेने कुटुंबासह रुग्णालयातील नर्स आणि कर्मचारीही हळहळले आहेत. डिलीव्हरीनंतर कोरोना रुग्ण बाळंतीणीच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना घडलेली आहे.