दिशा कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावणार: गृहमंत्री
!["Pressure from seniors not to open their mouths on Anil Deshmukh" - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Anil-Deshmukh-2.jpg)
मुंबई | महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यात दिशा कायदा आणू अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली होती. मात्र कोरोनाचा फटका दिशा कायद्याला सुद्धा बसला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दिशा कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी गृहमंत्र्यांनी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. यावेळी त्यांनी असे सांगितले की, ‘महिला अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महिला सुरक्षेसंदर्भातला दिशा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत आहे. त्यामुळे या कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी आवश्यकता भासल्यास अध्यादेश काढू आणि कायदा करु अशी माहिती विधानपरिषदेत दिली होती. यावर बोलताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, हा कायदा तयार करताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचार मंथन होणं गरजेचे आहे.
त्यामुळे यासाठीचा अध्यादेश न आणता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. तसंच, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.