गुन्हेगारी पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-78.png)
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी का दिली, याची कारणे सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या वेबसाईटवर द्यावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. या संदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी निवडणूक पद्धतीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि राजकीय पक्षांना त्यांच्या निर्णयांसाठी जबाबदार धरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश जारी केले.
एखाद्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे. म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना आणि त्याच्यावर खटले दाखल असतानाही त्याला उमेदवारी देणे हे काही कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा त्यांच्यावर खटले दाखल आहेत. त्यांची नावे एका स्थानिक आणि एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध केली पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सवर अर्थात फेसबुक, ट्विटरवर त्यांची नावे जाहीर केली पाहिजेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कोणत्या कारणामुळे या व्यक्तींना उमेदवारी दिली, ते कारणही संबंधित राजकीय पक्षांना आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करावे लागेल.