गँगस्टरला मुंबईहून उत्तर प्रदेशला नेताना कार पलटी; गँगस्टरचा जागीच मृत्यू
![Four friends killed in tractor-car crash in Chandrapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/accident-759.jpg)
भोपाळ – वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना वाटेत मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला झालेल्या अपघातात त्या गँगस्टरचा मृत्यू झाला आहे. फिरोज अली उर्फ शामी असे या गँगस्टरचे नाव आहे. लखनऊ पोलिसांच्या टीमने शनिवारी फिरोज अलीला नालासोपारा येथील झोपडपट्टीतून अटक केली होती.
पोलीस त्याला कारने उत्तर प्रदेशला नेत असताना मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात पोलिसांची कार पलटी झाली. त्यामध्ये फिरोज अलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २६वर अपघाताची ही घटना घडली.
या घटनेने गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलीस मध्य प्रदेशातून अटक करुन उत्तर प्रदेशला घेऊन जात असताना अशाच प्रकारे वाहन पलटी झाले होते. त्यानंतर तिथून पळण्याचा प्रयत्न करणारा विकास दुबे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता.