कौंडण्यपूरातील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/1palakhi_20final.jpg)
आषाढी एकादशी आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्या आहेत. कोरोनामुळे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा आषाढी एकादशीचा किंवा पालखी सोहळा साजरा करता येणार नाही…तसेच सर्व माऊली प्रेमींना आपल्या माऊलीला भेटताही येणार नाही..ठराविक आणि मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत या वारीतील एक-एक सोहळा पार पडत आहे आणि दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. ही पालखी पंढरपूरला नेण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी विदर्भातील वारक-यांनी केली होती. अखेर शासनाने यास परवानगी देत यंदाही ही पालखी पंढरपूरला जाणार आहे.
कोरोना व्हायरसचे संकट महाराष्ट्रावर असल्यानं भव्यदिव्य वारीला राज्य शासनाकडून मनाई करण्यात आली. ठराविक आणि मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत या वारीतील एक-एक सोहळा पार पडत आहे. तब्बल 425 वर्षांपूर्वींची परंपरा अबाधित राहिल्यामुळे अनेक वारक-यांचा जीव भांड्यात पडला आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते…
माता रुक्मिणीची ही पालखी ही केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त 1 जुलै रोजी आषाढी यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकार सोबत झालेल्या चर्चेमध्ये सुवर्ण मध्य काढत वारकर्यांनी कोरोना व्हायरसचं जागतिक संकट पाहता पायी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बदल केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करत यंदा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान 1 जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्याने 30 जून पर्यंत पालखी मंदिरामध्येच राहील. तर सरकारच्या पुढील आदेशाप्रमाणे दशमीला पंढरपुरला पादुका घेऊन जाऊन त्याचं पूजन केलं जाणार आहे.