कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यासच महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात एन्ट्री
![Corona Report Negative Assyasch Maharastrail Pravashana Karnataka Entry](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/karnatak.jpg)
कोल्हापुर । प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने कोगनोळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाका उभा केला आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांची तपासणी या ठिकाणी होत आहे. ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशाजवळ नसल्यास त्यांना या तपासणी नाक्यावरूनच परत महाराष्ट्र पाठवून देण्यात येत होते. त्यामुळे सकाळी १० वाजता कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. तपासणी करण्यात येत असल्याने वाहनांच्या रांगा लागुन, वाहतुक खोळंबा होत आहे.
महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक सरकारच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.
त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत माघारी महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.
याठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, प्रभारी मंडल पोलीस निरीक्षक आय एस गुरुनाथ, पीएसआय बी. एस. तळवार यांच्यसह पन्नासहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी अचानकपणे सुमारे पन्नास पोलिसांचा ताफा सर्कलमध्ये कार्यरत झाल्यामुळे अनेक प्रवाशांची एकच कोंडी उडाली होती. पोलिसांच्याकडून रस्त्यावरती बॅरिकेड्स लावून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांकडे ७२ तासांच्या आतील कोविड प्रमाणपत्र असल्याची तपासणी केली जात होती. ज्या प्रवाशांच्या जवळ ७२ तासांतील प्रमाणपत्र होते. त्यांना कर्नाटकातील प्रवेश दिला जात होता.