कोरोनाची चाचणी करण्याच्या निकषांमध्ये ICMR ने केले मोठे बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus-89-620x400-1.jpg)
कोरोना विषाणूचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाला आहे की नाही, याची चाचणी करण्याच्या निकषांमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हणजे आयसीएमआरने मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण सहा ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याची तपासणी करण्याची सोय उपलब्ध आहे. ही सर्व सरकारी व्यवस्था आहे.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारेच व्यक्तीची चाचणी केली जाते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. नव्या बदलांनुसार, कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पण फ्लूची कोणतीच लक्षणे नसलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत लक्षणे दिसत नाही, तोपर्यंत कोणाचीही चाचणी केली जात नव्हती. पण आता संपर्कात आलेल्या आणि लक्षणे न दिसलेल्या व्यक्तींचीही चाचणी केली जाणार आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले, देशात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळेच आम्ही चाचणी करण्याच्या निकषांमध्ये बदल केला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची आता चाचणी केली जाणार आहे. जरी संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी त्याची चाचणी करण्यात येणार आहे. यापुढे न्युमोनिया झालेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल आणि इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हेलिअन्स प्रोग्राम यांना देणे बंधनकारक कऱण्यात आले आहे.