कुमारस्वामींचा आज शपथविधी, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/HD-Kumaraswamy_-.jpg)
बंगळूरू : जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर हे शपथ घेतील. त्यामुळे आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर येईल.
कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुमारस्वामी यांनी देशभरातील नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
शपथविधीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बसपा अध्यक्ष मायावती, सपा नेते अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कमल हसन, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत.