काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनाने निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ahmed.jpg)
नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे आरोग्य ढासळले होते. जास्त त्रास सुरू झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ‘माझे वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याची घोषणा जड अंतःकरणाने करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून कोरोना नियमांचे पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा’, असे फैजल पटेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अहमद पटेल यांनी 1 ऑक्टोबर रोजी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.
देशभरात काँग्रेसची पिछेहाट होत असतानाच अहमद पटेल यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. ते सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसेच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचे स्थान होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.