कर्नाटक निवडणुकीमुळे इंधन दरवाढ रोखली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/09/petrol.jpg)
नवी दिल्ली – कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे इंधन दरवाढ रोखण्यात आल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर प्रति पिंपामागे सुमारे 3 अमेरिकी डॉलर्सने वाढले आहेत. असे असूनही भारतात सार्वजनिक कंपन्यांनी 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केलेला नाही.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे यादिवशी मतदान होईल.
तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, दरवाढीमुळे ग्राहकांना होणाऱ्या यातना टाळण्यासाठी आम्ही इंधन दर तात्पुरते सौम्यच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) या सार्वजनिक कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी आज म्हटले. अर्थात, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाचे दर चढेच राहिल्यास दरवाढ होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले. तर इंधन दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्याने आणि सार्वजनिक कंपन्यांना दरनिश्चितीचे स्वातंत्र्य देण्यात आल्याने इंधन दरांशी सरकारचा संबंध नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.
काही दिवसांपूूर्वी पेट्रोल दराने 55 महिन्यांचा उच्चांक गाठला. तर डिझेलच्या दराने आजवरचा सर्वोच्च दर गाठला. त्यानंतरही ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधनांवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यास नकार दर्शवला. मात्र, कर्नाटक निवडणुकीमुळे दर न वाढवण्याची सूचना सरकारकडून सार्वजनिक इंधन कंपन्यांना केली जाईल, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्याचा सरकार आणि सार्वजनिक कंपन्यांकडून इन्कार करण्यात आला. मात्र, मागील काही दिवसांचे चित्र पाहता इंधन दरवाढ टाळली गेल्याचे चित्र आहे.