अयोध्येत दीपावली, राम मंदिर भूमिपूजन सोहळा अगदी काही तासांवर…
![According to Vishwa Hindu Parishad, 25,000 million donations have been collected till February 4 for the construction of Ram Mandir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ayodhya-ram-mandir-1.jpg)
लखनौ: ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचलेले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आलेले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्या भरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढलेली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आलेले आहे. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. एनएसजी कमांडोंसह चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. अद्ययावत गाड्या आणि सुरक्षा ताफ्याची अयोध्येच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आलेली आहे. साकेत महविद्यालयाच्या मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे.