अमेरिकेत आजपासून TikTok आणि Wechat वर बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/tiktok-we-chat-AMEIRIKA.jpg)
वॉशिंग्टन – भारतानंतर आता अमेरिकेनेही चीनला दणका दिला आहे. उद्या रविवारपासून TikTok आणि Wechatवर अमेरिकेने बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही घोषणा केली आहे. अमेरिकेत या दोन ॲप्सचे सुमारे १० कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका टिकटॉक आणि वुईचॅटला बसला आहे.
TikTok आणि Wechatवर बंदी घालण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत चर्चा सुरू होती. टिकटॉक विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टला ट्रम्प प्रशासनाने अनेकदा मुदत दिली होती. परंतु त्यानंतरही हा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून ट्रम्प प्रशासनाने टिकटॉक आणि वुईचॅट या दोन्ही चिनी ॲप्सवर रविवारपासून अमेरिकेत बंदी घातली असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार रविवार २० सप्टेंबरपासून अमेरिकेत कोणालाही हे दोन्ही ॲप डाऊनलोड करता येणार नाहीत. हे ॲप वापरणाऱ्याची सर्व माहिती चीनला मिळत असल्याची शंका मध्यंतरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. या माहितीचा वापर चीनमधील कम्युनिस्ट पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी करण्याची शक्यता होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही ॲप्सवर अमेरिकेत बंदी घातली आहे.