अफगाण सैन्याकडून 9 नागरिकांची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/AFGA.jpg)
काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहार प्रांतात एका घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान सुरक्षा दलांनी मोठी चूक केली आहे. दहशतवादी समजून केलेल्या त्यांच्या या कारवाई 9 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. चापरहार जिल्हय़ात सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईत अन्य 8 नागरिक जखमी झाल्याची माहिती प्रांताचे गव्हर्नर हयातुल्लाह हयात यांनी दिली. मृतांमध्ये एक स्थानिक पोलीस कमांडर देखील सामील आहे.
ज्या घरावर छापा टाकण्यात आला, तेथून गोळीबार होत असल्याने सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. मोहीम संपुष्टात आल्यानंतर शोध घेतला असता तेथे मृत नागरिक आढळल्याचे हयात यांनी सांगितले. नांगरहार रुग्णालयाचे प्रवक्ते इनामुल्लाह मियाखैल यांनी 9 मृतदेहांची पुष्टी दिली आहे.
पूर्व अफगाणिस्तानात तालिबान तसेच इस्लामिक स्टेट या दोन्ही दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. तालिबान आणि इस्लामिक स्टेटने स्वतःच्या कारवायांसाठी नागरिकांची ढाल करत अनेकदा पळ काढला आहे. सैन्याने नागरिकांच्या बचावासाठी कित्येकदा माघार देखील घेतली आहे.