अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह; सांगली जिल्ह्यात एक धकाकादायक प्रकार समोर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/death.jpg)
सांगली: जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात एक धकाकादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तिवर अंत्यसंस्कार झाल्यानतंर तो कोरोना पॉझिटिव्ह होता हे समजल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर गावातील 30 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्वांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी गावातील एक व्यक्ती मुंबईत हृदयाच्या आजारावर उपचारासाठी आठवड्यापुर्वी गेली होती. 18 एप्रिलला त्या व्यक्तीचे निधन झाले. त्याचदिवशी मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी आणण्यात आला आणि 19 एप्रिलला अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन दिवसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मुंबईच्या रुग्णालयात कोरोना टेस्टच्या रिपोर्टबाबत विचारणा केली. रुग्णालयाने रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाने थेट गाव गाठले. त्यानंतर मृतदेह आणण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन कऱण्यात आलं आहे.