खेड मध्ये कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय
नवे ७७ रुग्ण ; १ मृत्यू; २८ डिस्चार्ज
चाकण | खेड तालुक्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. खेड तालुक्यात शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी २९ गावे आणि ३ पालिकांमध्ये ७७ रुग्ण मिळून आले आहेत. तर राजगुरुनगर येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा ३४ हजार ८०९ झाला आहे. यापैकी ३३ हजार ८६१ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत ३७२ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी १ मृत्यूने ५७६ एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ४९ रुग्ण, चाकण २, आळंदी ५, राजगुरुनगर २१ असे एकुण ७७ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.
खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बहुळ , भांबोली, सायगाव, वडगाव पाटोळे, वाकी बु. , शेलपिंपळगाव , बिरदवडी, बुट्टेवाडी , चांदूस , गुळाणी , कडूस , कनेरसर , कान्हेवाडी , कोरेगाव बु. , कुरकुंडी, मेदनकरवाडी, महाळुंगे , मोई , नाणेकरवाडी , निघोजे ,पाडळी या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण मिळून आला आहे. पाईट ,राक्षेवाडी, ढोरेभांबुरवाडी ,सातकरस्थळ या गावांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण , शिरोली ,मरकळ मध्ये प्रत्येकी ३ रुग्ण मिळाले असून चांडोली व चिंचोशी मध्ये प्रत्येकी ७ रुग्ण मिळून आले आहेत.
चिंता वाढवणारे आकडे :
खेड तालुक्यात दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी कमी झालेली रुग्णसंख्या किंचित का होईना, पण काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून खाली घसरलेली एकूण सक्रिय रुग्णसंख्या देखील उंचावत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. राजगुरुनगर शहरात रुग्णवाढ सुरु झाली आहे. गुरुवारी (दि.९) राजगुरुनगर शहरात ३० रुग्ण मिळाले होते. तर शुक्रवारी (दि.१०) २१ नवे रुग्ण मिळाले आहेत. कोरोनाचा उंचावता आलेख नागरिकांची चिंता वाढवणारा आहे.