धक्कादायक! ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला आणि काळाने डाव साधला; ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू
![Shocking! The oxygen tanker missed the route and time landed; 7 patients died of concussion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/oxygen-tanker-2.jpg)
हैद्राबाद |
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अनेक रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं आहे. त्यात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावं लागत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ जणांना प्राणाला मुकावं लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ रुग्णांची स्थिती अत्यवस्थ होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.
रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टॅकर रस्ता चुकला आणि ७ जणांचा जीव गेला. वाट चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत उशिर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
वाचा- मुंबईतलं ते 21 कोटींच युरेनियम प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!