कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
![Pimpri-Chinchwad Municipal Corporation's 'Micro Planning' for the third wave of Corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-24-at-6.23.32-PM.jpeg)
- आमदार महेश लांडगे यांची प्रशासन- पदाधिकारींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
- पहिल्या, दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लक्षात आलेल्या उणीवांची पूर्तता करतानाच तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले आहे. आगामी काळात कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. तसेच, शहरात म्युकर कायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकारी यांची सोमवारी महापालिका भवनात संयुक्त बैठक घेतली.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, सहायक वैद्यकीय अधिकारी गोफणे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, आगामी काळात कोरोनाचा धोका लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. आरोग्यविभागाशी निगडीत जागांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अकुशल कामगारांची भरती करुन त्यांना प्रशिक्षीत करता येईल का? याबाबत सकारात्मक धोरण ठरवण्यात येणार आहे.
- वॉर्डस्तर, गाव पातळीवर नियोजन…
शहरात वॉर्डस्तरावर आणि गाव पातळीवर कोरोना नियंत्रण कमिटी तयार करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील कोरोना नियंत्रणासाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये १० ते १५ टक्के वाढ करुन आगामी दोन वर्षांसाठी प्रशासनाने खर्चाची तरतूद करावी, असे आदेश आमदार लांडगे यांनी यावेळी दिले. यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.
- लहान मुलांच्या आरोग्याची काळजी…
शहरातील लहान मुलांसाठी चिखली घरकूल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यात येणार आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) १५० ऑक्सिजन बेड, ३० आयुसीयू बेडची व्यवस्था केली आहे. तसेच, १२ एनआयव्ही बेडचीही व्यवस्था केली आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयामध्ये १०० ऑक्सिजन बेड, २ एनआयव्ही आणि १२ आयसीयूची व्यवस्था आहे, अशा प्रकारे लहान मुलांना असलेल्या संभाव्य धोका लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने यंत्रणा सक्षम केली आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
- म्यूकर मायकोसिससाठी २२ तज्ज्ञांची टीम…
म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी पुरेसा औषध पुरवठा झाला पाहिजे. संबंधित रुग्णांची तात्काळ शस्त्रक्रिया करता यावी. यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार देण्यात येणार आहेत. वायसीएम रुग्णालयात म्यूकर मायकोसिसच्या रुगांवर उपचार करण्यात येत आहेत. शहरातील म्यूकर मायकोसिसला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने २२ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांनाही प्रशासन मदत करीत आहे.
- शहरात १०० तपासणी हेच लक्ष्य: आयुक्त राजेश पाटील
महापालिका प्रशासानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडेआठ लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी १०० टक्के करण्याची प्रशासनची भूमिका आहे. त्यासाठी होम टू होम यंत्रणा राबवण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. पण, त्यासोबत विलगीकरणाची कडक अंमलबजावणी करावी लागेल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच, शहरातील पथारीवाले, भाजीवाले, रोजंदारीवर काम करणारे मजूर यांचीही तपासणी करण्याबाबत प्राधान्य दिले जाणार आहे.