आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण

पतंजलीच्या उत्पदनाचा दर्जा निकृष्ट

मुंबई : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण अडचणीत आले आहेत. दरम्यान, या कंपनीसमोरील अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर आता पतंजलीसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांवर कारवाई केली आहे. तिघांनाही सहा महिन्यांचा कारावास आणि दंड अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.

पाच वर्षांपूर्वी, १७ ऑक्टोबर २०१९ रोजी अन्न सुरक्षा निरीक्षकांनी पिथोरागडच्या बेरीनागमधील मुख्य बाजारपेठेतील लीलाधर पाठक यांच्या दुकानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या दुकानातील काही खाद्यपदार्थांची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांनी दुकानातील ‘पतंजली नवरत्न इलायची सोनपापडी’बाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर दुकानातील सोनपापडीचे काही नमुने त्यांनी गोळा केले. यासह रामनगर येथील ‘कान्हा जी’ या वितरकाला (पतंजली सोनपापडीचे वितरक) आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती.

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनागपाठोपाठ रुद्रपूर, उधम सिंह नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजली सोनपापडीचे नमुने गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर २०२० मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, विरतक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या तिघांना अनुक्रमे, ५,००० रुपये, १०,००० रुपये आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई करताना न्यायालयाने म्हटलं आहे की, “आमच्यासमोर सादर केलेले पुरावे हे पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट निर्देश करतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे या तिन्ही व्यक्तिंविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.”

फसव्या जाहिरातींप्रकरणी रामदेव यांच्या वकीलांवर न्यायमूर्तींचा संताप
सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिरांतीप्रकरणी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी उत्तराखंड परवाना प्राधिकरणाला (उत्तराखंड लायसन्सिंग अथॉरिटी) फटकारलं होतं. न्यायालयाने पंतजलीच्या फसव्या जाहिरांतीप्रकरणी प्राधिकरणाच्या निष्क्रियतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच न्यायमूर्ती म्हणाले, “तुमची झोप आत्ता पूर्ण झालीय वाटतं, नुकतेच झोपेतून जागे झालात असं दिसतंय.” या सुनावणीवेळी महाधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी रामदेव आणि बाळकृष्ण यांची बाजू मांडली. रोहतगी म्हणाले, “आम्ही वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा छापला होता. तो माफीनामा न्यायालयाने आपल्याकडे जमा केला आहे.” यासह रोहतगी यांनी पंतजलीचा माफीनामा न्यायमूर्तींसमोरही सादर केला. न्यायालयाने मुकूल रोहतगी यांना प्रश्न विचारला की, तुम्ही मूळ नोंदी का सादर केल्या नाहीत. न्यायालयाने तुमच्याकडे मागितलेली माहिती ई-फायलिंग स्वरुपात सादर करण्यात आली आहे जी खूप गोंधळ निर्माण करणारी आहे. तुमचा हा सगळा गोंधळ पाहून आम्ही आता हात वर केले आहेत. आम्ही मूळ प्रती मागितल्या होत्या, त्या कुठे आहेत, त्या कधी सादर करणार? मूळ प्रती तातडीने सादर करा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button