आरोग्यताज्या घडामोडीविदर्भ

पेनकिलरच्या अमर्याद वापरातून किडनी विकार

शहरात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय आयुर्वेद परिषद’ आयोजित

नागपूर : डोकेदुखी ते सर्वच प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळावी यासाठी रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध दुकानांतून पेन किलर खरेदी करून त्याचा वापर करतात. कोरोना काळातही गरज नसताना स्टिरॉईडचा अमर्याद वापर झाला. म्युकर मायकोसीसमुळे त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम झाले. अशा परिस्थितीत पेनकिलर सोडून आयुर्वेदिक शास्त्रात वेदना दूर करणारी औषधी घ्यावी आणि पेनकिलरचा होणारा अमर्याद वापर बंद करावा, असे मत आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे (निमा) शहरात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय आयुर्वेद परिषद’ आयोजित केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निमाचे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. शांतीदास लुंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोणत्याही पॅथीनुसार सेवा देणारा डॉक्टर रुग्ण हिताला प्राधान्य देत असतो. रुग्णाला आजारपणातून मुक्ती देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. अशावेळी डॉक्टरांनी पॅथीविषयी असलेला इगो बाजूला ठेवून रुग्णहिताच्या एकाच ध्येयाने एकत्र येणे आवश्यक आहे. या दोन दिवसीय परिषदेत हाच विषय केंद्रस्थानी ठेवून सर्व पॅथींमध्ये विचारमंथन घडविले जाणार आहे. पत्रकार परिषदेत डॉ. राधेश्याम शर्मा, डॉ. जगमोहन राठी, डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. वैशाली पडघन, डॉ. एन. आर. भेंडे, डॉ. रुपाली डांगोरे, डॉ. मोहन येंडे उपस्थित होते.

उद्घाटनाला येणार केंद्रीय आयुष मंत्री
रविवारी या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता किंग्जवे हॉस्पिटलजवळच्या परवाना भवन येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते होणार आहे. विधान परिषदेचे सदस्य कृपाल तुमाने, माजी मंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत रहाटे, विभागीय आयुर्वेद अनुसंधान केंद्राचे संचालक डॉ. मिलिंद सूर्यवंशी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निरीक्षक डॉ. प्रज्ञा डाखोळे, निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तर शनिवारी (ता.३१)भाऊ मुळक आयुर्वेद महाविद्यालयात शोधप्रबंध आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुमारे २५० शोधप्रबंध परिषदेत आले आहेत. यात ९० प्रबंध आयुर्वेद शाखेतील प्राध्यापकांचे असल्याचे डॉ. मोहन येंडे म्हणाले.

रोगावर उपचार करीत असताना अनेकदा रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असते. त्यासाठी अनेकदा औषधीपेक्षा योगा, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन मोलाची मदत करते. आधुनिक चिकित्सा पद्धतीनुसार आता आयुर्वेदातही पुराव्याच्या आधारावर शास्त्रीय संशोधन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button