आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

राज्यात पडलेल्या जोरदार पावसाबरोबर पावसाळी आजारांनीही डोकेवर काढले

मुंबईसह राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईनफ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात

मुंबई : राज्यात पडलेल्या जोरदार पावसाबरोबर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईनफ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर गॅस्ट्रोच्या आजारानेही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या आजारांच्या रुग्णांच्या असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त रुग्ण जुलै २०२४ मध्ये आढळून आले आहेत.

पावसाचे पाणी जागोजागी साठून राहात असल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो बळावला आहे. त्याचबरोबर टायफॉईड, काविळचे रुग्णही वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांनी हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडून या आजारांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैमधील आकडेवारीनुसार हिवताप, चिकनगुनिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

मागील तीन वर्षांत हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया यांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. २०२२ मध्ये राज्यात हिवतापाचे १५,४५१ रुग्ण आढळले तर २०२३ मध्ये १६,१५९ रुग्णसंख्या होती. डेंग्यूचे रुग्ण २०२२ मध्ये ८,५७८ एवढे होते तर २०२३ मध्ये यात वाढ होऊन १९,०३४ रुग्ण आढळून आले. चिकनगुनियाच्या रुग्णातही २०२२ च्या तुलनेत वाढ झालेली दिसते. अनुक्रमे १०७५ व १७०२ असे चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले दिसतात. २०२४ मध्येही या आजारांनी डोके वर काढले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात या तिन्ही आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये हिवतापाचे ५१६९ रुग्ण होते तर यंदा ६१४१ रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूचे रुग्ण गेल्या जुलै महिन्यात ३१६४ एवढे होते तर यंदा ४२५२ रुग्णांची संख्या आढळली आहे, तसेच चिकनगुनियाचे रुग्ण गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत दुपटीहून अधिक आढळून आहे आहेत. गेल्यावर्षी ३६३ रुग्णांची नोंद होती तर यंदा जुलैमध्ये ९२८ रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत असून लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्याही मागील तीन वर्षे सातत्याने वाढताना दिसते. २०२२ मध्ये लेप्टोचे ४५८ रुग्ण होते ते २०२३ मध्ये १४८४ एवढे झाले तर १४ जुलै २०२४ पर्यंत ही संख्या ११०० असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने व्यापक तयारी केली असून पालिकेच्या प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ६ बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला असून व्यापक जनजागृती तसेच घरोघरी जाऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. किटकनाशक विभागाकडून मोठ्या प्रमाणात धुम्र फवारणी सुरु आहे. तसेच लेप्टोस्पायरोसिस रोखण्यासाठी मुषकनाशक मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत २ लाख ३९ हजार उंदरांचा खात्मा केला असून गेल्या दोन आठवड्यात १३,२५५ उंदीर मारल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागानेही व्यापक जनजागृतीबरोबर हिवताप निर्मूलनासाठी ६९ उपचार केंद्र सुरु केली आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी रॅपिड चाचणी किट दिले असून राज्यात किटकनाशक भारित ४,९५,२५१ मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २,१२,५६९ किटकनाशक भारित मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले असून डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी ११,०१८ गप्पी मासे पैदास केंद्र निर्माण केली आहेत. यातून तयार झालेल्या गप्पी माशांना डास पैदास करणाऱ्या पाणसाठ्यांच्या ठिकाणी सोडण्यात येते. यंदा १,१६,४६२ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button