वॉररुम सज्ज करा, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा ; केंद्राचे राज्यांना पत्र
![Equip the warroom, impose night curfew if necessary; Centre's letter to the states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/night-curfew.jpg)
देशातील कोरोनाचे संकट ओसरत असतानाच नव्यानं आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुखी वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 213 एवढी झाली आहे. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा गंभीर असून संसर्गाचा वेग तिप्पट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी वॉर रूम पुन्हा सज्ज करा, तसेच गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे.
केंद्राने याबाबत सर्व राज्यांना मंगळवारी (दि. 21) पत्र पाठवले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट शिवाय यापूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरिएंट अद्यापही देशातील काही राज्यांमध्ये सक्रीय असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे दूरदृष्टीचा अवलंब करून, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. व्हायरसचा ट्रेंड आणि संसर्गाची ठिकाणे यासंबंधीच्या डेटाचे बारकाईने परीक्षण करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 213 झाली असून, त्यापैकी दिल्लीत 57 तर, महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 213 पैकी 90 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तसेच, देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या उतरणीला लागली आहे. सध्याच्या घडीला देशात 78 हजार 190 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल 575 दिवसांनंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाली आली आहे. यामुळे देशाचा रिकव्हरी रेट देखील वाढून 98.40 टक्के एवढा झाला आहे.