#Covid-19: रेमडेसिविरचा काळाबाजार जोरात
![# Covid-19: Demand for two thousand 'Remedisivir', only 390 available in Solapur!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/remedesivir.jpg)
- अधिकृतपणे साठा संपल्याचे उत्तर; मागच्या दाराने हजारो रुपयांना विक्री
विरार |
वसई विरारमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. रुग्णालयात कोविड १९ वर उपचार घेणाऱ्यांना इलाजासाठी रेमडेसिविरची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे याचा मोठा तुटवडा संपूर्ण जिल्ह्यात जाणवत आहे. पण हीच इंजेक्शन्स काळ्याबाजारात अवाजवी किंमत मोजून मिळत आहेत. शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार फोफावत असताना अन्न व औषध प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे शहरात रेमडेसिविरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप होत आहे. वसई विरारमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत असताना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने आधीच हैराण झालेले रुग्ण आता रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने मेटाकुटीला आले आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जाते. अनेक ठिकाणी साठा असूनही रुग्णांना बाहेरून हे इंजेक्शन आणायला सांगितले जाते. पण बाहेर रुग्णांना हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नसल्याने हैराण होतात. तर काही रुग्णालयांकडून खासगी वितरकांचे संपर्क रुग्णाच्या नातेवाईकांना देऊन ४ हजार ते १५ हजार रुपयांच्या किमतीत इंजेक्शन मिळवून दिले जात आहे
विरारमधील एका रुग्णाला रेमडेसिविर हवे असताना त्यांनी वसईतून रेमडेसिविरचे २ डोस ८ हजार रुपयाला विकत घेतले. तर इतर २ डोस ठाणे येथून ३ हजार रुपयांना विकत घेतले. यावेळी रुग्णाचे आधारकार्ड, कोविड रिपोर्ट, डॉक्टरांचे पत्र आणि नातेवाईकाचे आधारकार्ड या वितरकाने घेतले. पण त्याचे कोणतेही बिल मात्र दिले नाही. असे अनेक प्रकार घडत आहेत. ‘खासगी औषध दुकानांना रेमडेसिविरची परवानगी बंद करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयांच्या औषधालयांमध्येच इंजेक्शनच्या साठ्याला परवानगी देण्यात आली आहे. मग बाहेरील वितरकांना ही औषधे कशी मिळतात,’ असा सवाल ‘केमिस्ट परिवार ऑफ न्यूज’चे अध्यक्ष दीपंकर पाटील यांनी केला. यामध्ये शासकीय कर्मचारी सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त प्रवीण मुंदडा यांनी मात्र रेमडेसिविरचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला. शहरातील तुटवडा पाहता रुग्णसंख्येच्या टक्केवारीनुसार जिल्हानिहाय रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनतर्फे सर्वत्र पाहणी केली जात आहे. असे काही आढळ्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
वाचा- धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…