#Covid-19: आळशी लोकांना करोनामुळे मृत्यूचा धोका जास्त; नव्या अभ्यासातील धक्कादायक माहिती
![# Covid-19: Lazy people have a higher risk of dying from corona; Shocking information from a new study](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/lazy-kid.jpg)
मुंबई |
आळस हा माणसांचा शत्रू आहे, असं शालेय जीवनापासूनच ऐकायला मिळतं. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असंही सांगितलं जातं. पण, आता ही आळशीवृत्तीच करोना मृत्यूच कारण ठरू शकणार आहे. हो, आळशी लोकांना करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले असून, आळशी लोकांसाठी हा धोक्याचा इशाराच आहे.
व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. करोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली (चालणं/फिरणं) कमी आहेत. त्यांना करोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, असं नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
या संशोधनासाठी ५० हजार करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना करोना संसर्गाचा आणि करोनामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता यापेक्षाही शारीरिक हालचाल (शारीरिक निष्क्रियता) न करणे, यामुळे करोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा ४८ हजार४४० लोकांमध्ये करोनाची लक्षणं अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काहींना आयसीयूची भरती करावं लागलं, काहींचा मृत्यू झाला. जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला.