#Covid-19: कुंभमेळ्यात करोनाचा मोठा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग
![# Covid-19: Corona infiltrates Aquarius; Infection of thousands in two days in Haridwar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/kumbh-mela-PTI.jpg)
नवी दिल्ली |
देशात करोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये करोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक करोनाबाधित आढळून आले आहेत.
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
- ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग
इंडियन एक्स्प्रेसनं कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात करोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नसल्याचं दिसलं. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.
वाचा- कुंभमेळ्याची निजामुद्दीन मरकजशी तुलना अयोग्य: उत्तराखंडचे मुख्यमंत्री