#CoronaVirus: उवा मारण्याचं औषध कोरोनावर ठरणार रामबाण उपाय?
चीनमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या करोनाचा विषाणूचा संसर्ग १६ लाखांहून अधिक जणांना झाला आहे. तर या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. जगभरातील अनेक देशांमधील वैज्ञानिक करोनावरील औषध आणि लस शोधण्यासंदर्भातील संशोधन करत आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही यामध्ये यश आलेले नाही. करोनाचे रुग्ण बरे होतील अशा प्रकारची एकही लस अद्याप सापडलेली नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील एका महिला संशोधकाने करोनासंदर्भातील औषध सापडल्याचा दावा केला आहे.
या महिला संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार उवा मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या मदतीने केवळ ४८ तासामध्ये करोना झालेल्या रुग्णाला बरं करता येणं शक्य आहे. या औषधावर आणखीन संशोधन करण्याची गरज असल्याचेही या महिला संशोधकाने म्हटले आहे. करोना झालेल्या कोणत्याही रुग्णावर अद्याप या औषधाचा प्रयोग करण्यात आलेले नाही. या औषधाचे अनेक साईड इफेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे.